Saturday, June 13, 2015

मुसळधार पाउसात भिजतो आहे मी



मुसळधार पाउसात भिजतो आहे मी,
आई ओरडणार हे माहित असूनही.

शाळा सुटली, पोटात ओरडू लागलेत कावळे.
तरी का तयार नाहीत, घरी वळण्यास हि पावले.
जोरदार पाउस अंगास झोंबतो आहे
आणि सोबतीला गार वारा हि.

मुसळधार पाउसात भिजतो आहे मी,
आई ओरडणार हे माहित असूनही.

कपडे सुकणार नाहीत उद्या शाळेत जायला
पण भेटतील का हे क्षण कधी परत पाहायला
भिजुद्या मला आजच, जितका भिजायचा तेवढा
कोणास ठाऊक पडेल का पाउस उद्या, पडायला हवा जेवढा.

येईल का मातीचा सुगंध परत,
दिसेल का पुन्हा हिरवळ हि.
मुसळधार पाउसात भिजतो आहे मी,
आई ओरडणार हे माहित असूनही.